अहमदनगर - तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र महेश भागवत यांची निवड झाली आहे. ही बाब जिल्ह्याला भूषणावह असून पाथर्डीच्या शरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवणारी आहे.
सुरवातीस आयपीएस म्हणून मणिपूर व आंध्रप्रदेशात विविध ठिकाणच्या पोस्टिंग मध्ये आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवून लोकसेवक म्हणून समाजाभिमुख सेवा देवून विविध सेवा पदकांचे भागवत मानकरी ठरले आहेत.
"अज्ञातम स्वेच्छा" प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली
आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात काम करीत असताना नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "अज्ञातम स्वेच्छा" प्रकल्प राबविला. पोलीस व नागरिकांच्या समन्वयासाठी "मैत्री संगम" निर्माण केला. नलगोंडा चे पोलीस अधीक्षक असताना यादगिरिगुट्टा येथील मानवी व्यापाराचे रॅकेट उघडकीस आणले.
यातील पीडित महिला व मुलींच्या उत्कर्षासाठी स्वयंरोजगार, शिक्षण व त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करून दिले. तसेच महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्येही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
सेवा काळातील अविरत विशेष कार्याबद्दल त्यांना प्रेसिडेन्टस पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (2004), पोलीस मेडल फॉर मेरीटोरियस सर्व्हिस (2011) व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचा व ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अवार्ड (2017) असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना सेवेत मिळाले.
पाथर्डीकरांसह जिल्हावासियांच्या शुभेच्छांचा वर्षाव - महेश भागवत यांच्या यथोचित पदोन्नतीसाठी व भावी वाटचालीस पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या नागरिकांसह जिल्हावासियांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून लोकसेवेच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.