सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली - प्रसिद्ध लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग एक दिवस’ या अनुवादित पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

साहित्य अकादमीच्या वतीने येथील कोपर्निकस मार्गस्थित कमानी सभागृहात आयोजित ‘साहित्योत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी वर्ष २०१९ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

यावेळी हिंदी भाषेतील प्रख्यात कथा लेखिका चित्रा मुद्गल उपस्थित होत्या. या समारंभात एकूण १९ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व अनुवादकांना  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद असलेले ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाच्या लेखिका परांजपे यांना पुरस्कार देण्यात आला. ५० हजार रूपये, ताम्रपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सई परांजपे यांनी ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाचा ओघवता व रसाळ अनुवाद केला त्यामुळेच हे कथन प्रामाणिक व परखड झाले आहे. छोट्या छायाचित्रांच्या बारा पृष्ठांच्या दृष्यभागाने या पुस्तकाच्या आशयात जिवंतपणा आला आहे. 

हे पुस्तक रंजक आणि नाट्यपूर्ण आणि साहित्यिक अंगानेही उत्तम ठरल्याने या पुस्तकाने मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा मान मिळविला आहे. या कलाकृतीला व लेखिकेला मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !