चेन्नई - मक्कल निधि मैयम (MNM) पक्षाचे प्रमुख अभिनेते कमल हसन यांच्या कारवर रविवारी हल्ला झाला आहे. हसन कांचीपुरममध्ये निवडणुकीच्या प्रचाराला हसन गेले होते. तेथून ते चेन्नईकडे परत येत होते, तेव्हा एका तरुणाने त्यांच्या कारवर हल्ला केला. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या अपघातामध्ये कमल हसन यांना कुठलीच इजा झाली नाही. परंतु, त्यांच्या कारचे मात्र नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
तामिळनाडू विधानसभेसाठी ६ एप्रिलला मतदान होत आहे. कमल हसन हे या निवडणुकीत कोयंबटूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. कमल हसन यांनी शुक्रवारी आपल्या पक्षाच्या 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. तसेच आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
तो युवक मद्यधुंद ?
हसन यांच्या पक्षाने सांगितले आहे की, हल्ला करणाऱ्या तरुणाने दारू पिलेली होती आणि त्याला कमल हसन यांना जवळून पाहायचे होते. त्यामुळेच, त्याने कारच्या काचेवर हल्ला केला. त्याच्या या हल्ल्यात कारच्या विंडस्क्रीनचे नुकसान झाले आहे. परंतु, कमल हसन हे सुखरुप आहेत.