जळगावमध्ये जैन-खडसे यांचा 'राईट कार्यक्रम', भाजपचा गड धोक्यात?

जळगाव - भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि गिरीश महाजन सारखा 'खंदा गडकरी' असताना जळगावमध्येच भाजपचा 'राईट कार्यक्रम' करण्याच्या हालचाली सुरु आहेत. जळगाव महापालिकेची सत्ता भाजपच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. येत्या दोन दिवसांवर महापौरांची निवड होणार असून ऐनवेळी भाजपचे 15 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र आता भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी मुंबई गाठत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती सामोरं येत आहे. भाजपचे 15 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

हे नगरसेवक सेनेच्या गटात गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या 5 वर्षात जळगाव जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनीही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली. मात्र आता या सत्तेचे बुरुंज ढासळतील अशी चिन्हे दिसत आहेत.

खडसेंची एक्झिट आणि धक्कातंत्र

गिरीश महाजन यांनी जळगाव भाजपमध्ये आपली पकड मजबूत केल्या नंतर एकनाथ खडसे यांचे राजकीय खच्चीकरण करत त्यांना दरवाजापर्यंत आणून उभे केले. महापालिका निवडणुकीत खडसे समर्थक एकाही नागरसेवकाला भाजपने तिकीट दिले नाही. नुकतेच एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले आहेत. आता एका मागून एका धक्के भाजपला देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

बेचैन नगरसेवक हवालदिल

महानगरपालीका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. मात्र राज्यातील  सत्ता गेली. त्यामुळे वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. निधी अभावी बेचैन झालेले अनेक नगरसेवक सेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचे दिसत आहे.

खडसे-जैन समीकरण भाजपला वरचढ

गेल्या काही वर्षांपासून अज्ञातवासात असलेले सुरेश दादा जैन हे जळगावच्या राजकारणात पुन्हा 'एक्शन मोड'मध्ये  आहेत. त्यामुळे भाजप विरोधात एकनाथ खडसे आणि सुरेश जैन हे दोन अनुभवी नेतृत्व एकत्र आल्यास भाजपला आगामी जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणूक सोपी ठरणार नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !