आयटीआय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! २८ हजार रु. प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार..

मुंबई - शासकीय तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. आयटीआयला पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेतात. खासगी आयटीआयमधून शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळतो. 

या योजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना १०० टक्के, तर अडीच लाख ते ८ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ८० टक्के रकमेच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. 

या विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार १९ हजार २०० ते २८ हजार ९०० रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

'या' कारागिरांना करणार प्रमाणित

राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागीर, कामगार आदी घटकांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील कारागीर, कामगार आदी कुशल घटकांना याचा लाभ होईल. 

यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्य ज्ञान मान्यता योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यासाठी 'असा' करा अर्ज

या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना १० मार्च २०२१ पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. ही सुविधा https:/mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याचा फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !