नवी दिल्ली - इंडियन मुजाहिदीन (IM) चा दहशतवादी आरिज खान याला साकेत कोर्टाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 'अतिदुर्मिळ' प्रकरण म्हटले आहे. आरिज याला दिल्लीमध्ये सन 2008 मध्ये झालेल्या बाटला हाउस एनकाउंटरशी संबंधित प्रकरणात 8 मार्चला दोषी ठरवले होते.
या एनकाउंटर दरम्यान आरिज पळून गेला होता. सन 2018 मध्ये त्याला नेपाळमधून अटक केले होते. कोर्टाने त्याच्यावर कलम 302, 307 आणि आर्म्स अॅक्टमध्ये दोषी ठरवले आहे. त्या एनकाउंटरमध्ये दिल्ली पोलिस इंस्पेक्टर मोहन चंद्र शर्मा हे शहीद झाले होते. आता आरिजला या प्रकरणात शिक्षा झाली आहे.
सोमवारी कोर्टात युक्तीवादाच्या वेळी आरिजकडून एमएस खान या वकिलाने बाजू मांडली. त्याने आरिजचे वय कमी असल्याचा हवाला देत शिक्षा कमी करण्याची विनंती केली. तर, सरकारी वकील एटी अंसारींनी मृत्युदंडाची मागणी केली हाेती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने अखेर फाशीचीच शिक्षा ठोठावली.
काय आहे 'बाटला हाउस एनकाउंटर' प्रकरण ?
दिल्ली शहरातील बाटला हाउसमध्ये 19 सप्टेंबर 2008 च्या सकाळी एक एनकाउंटर झाला होता. या घटनेच्या एका आठवड्यापूर्वी 13 सप्टेंबर 2008 ला दिल्लीतील 5 ठिकाणी सीरियल बॉम्ब स्फोट झाला होता. 50 मिनीटात झालेल्या या पाच स्फोटात 39 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
अशी केली कामगिरी..
दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते, तेव्हा ते बाटला हाउसमध्ये एल-18 नंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहचले. तिथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आले होते. तर, दोघांना अटक करण्यात आली व एक फरार झाला होता.