कर्ज माफीसाठी पात्र होता शेतकरी
ऊसाच्या पेमेन्टमधून कॅनरा बँकेने परस्पर केली होती कर्ज वसुली
शेवगाव - 'बँकेचे मार्च एंडिंगचे टार्गेट शेतकऱ्याच्या मुळावर' या मथळ्याखाली 'MBP Live24' ने बातमी प्रसिद्ध करून कर्जमाफीसाठी पात्र असतानाही उसाच्या पेमेंटमधून कॅनरा बँकेच्या वसुली विभागाने परस्पर कर्जाची रक्कम काढून घेतल्या प्रकरणी आवाज उठवत बँकेला जाब विचारला होता. या वृत्ताची दखल घेत बँक प्रशासनाने त्वरित पावले उचलत दोन दिवसात पीडित शेतकऱ्याच्या खात्यात आज पुन्हा पैसे जमा केल्याने MBP Live24' चे अभिनंदन होत आहे.
शेवगाव ( जिल्हा- अहमदनगर) तालुक्यातील समसूद एरंडगाव येथील शेतकरी अंबादास श्रीधर भागवत यांनी कॅनरा बँकेने उसाचे जमा झालेले पेमेंट परस्पर कर्ज खात्यात वळविले होते. यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे बँकेच्या या आडमुठे धोरणाचा निषेध करून आपल्याला त्वरित न्याय मिळावा, अशी भूमिका संबंधित शेतकऱ्याने घेतली. मात्र दखल घेत नसल्याने भागवत यांनी आपली व्यथा 'MBP Live24' कडे मांडली.
काय होते प्रकरण...
तक्रार अर्जात भागवत यांनी म्हटले होते, की माझे गट नंबर ३३ / ४ याचे ऊसाचे आलेले पेमेंट बँकैने परस्पर माझ्या खात्यातून कापून घेतले आहेत. १९ जून २०२० रोजीच माझ्या मोबाईल वर कर्जमाफीचा मेसेज आलेला असतानाही कॅनरा बँकेने माझ्या खात्यातून ऊसाचे पेमेंटमधून पैसे माझ्या परवानगीशिवाय परस्पर कापून घेतले. मात्र, मी शेतीसाठी बऱ्याच जणांकडून उसनवारी पैसे घेतले आहेत. मात्र, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. बैकने माझे पैसे परत द्यावेत.
पैसे रिपेमेंट झाले - आज कॅनरा बँकेचे व्यवस्थापक राजू पवार यांनी संबंधित शेकऱ्याशी आणि 'MBP Live 24' शी संपर्क साधून शेतकरी अंबादास भागवत यांच्या खात्यातून उसाच्या पेमेंटच्या पैशातून कर्ज खात्यात वर्ग केलेले पैसे आज पुन्हा त्यांच्या खात्यावर रिपेमेंट करण्यात आल्याचे सांगितले. संबंधित शेतकऱ्यानेही याबाबतची माहिती दिली आहे.
'एमबीपी लाईव्ह२४' मुळेच हे शक्य
माझ्या खात्यावर उसाच्या जमा झालेल्या पेमेन्टमधून कॅनरा बँकेने परस्पर पैसे कर्ज खात्यात वर्ग केल्यानंतर आता आपल्याला हे पैसे परत मिळतील अशी शास्वती नव्हती. त्यामुळे मी पुरता खचून गेलो होतो. मात्र, माझी व्यथा समजून घेऊन 'MBP Live 24'ने माझ्यावर झालेल्या अन्यायाला बातमीच्या स्वरूपात वाचा फोडली.
दोन दिवसात बँकेने पैसे माझ्या खात्यात जमा केले. आज बँक व्यवस्थापक पवार यांचा फोन आला, ते म्हणाले, 'तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत' पाहून घ्या' हे एकूण मोठा दिलासा मिळाला. हे केवळ आणि केवळ 'MBP Live 24' च्या आधारामुळे शक्य झाले. त्यांना मनापासून धन्यवाद.
- अंबादास भागवत, पीडित शेतकरी, समसूद एरंडगाव (ता-शेवगाव, जिल्हा- अहमदनगर)
कर्जमाफी झाली पण...
"माझ्या मोबाईल वर महात्मा फुले कर्जमाफीचा मेसेज आलेला आहे तरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत विशिष्ट क्रमांक नंबर १६०१२३६९७५ च्या आधारे आधार प्रमाणीकरण यशस्वी झालेले आहे. योजनेच्या निकषानुसार लाभ रक्कम आपल्या कर्जखात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे." असा मेसेज भागवत यांना त्यांच्या बाईलवर प्राप्त झाला आहे.
प्रत्यक्षात मात्र खात्यावर पैसे आले नाहीत. सरकारनेही या गोष्टीची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याची कर्जमाफीचे पैसे त्याच्या कर्ज खात्यात जमा करावेत.