नवं तंत्रज्ञान | आता 'या' पध्दतीने होणार निवडणुका, पहा कधी सुरु होईल वापर..

नवी दिल्ली - निवडणुकांमध्ये 'रिमोट वोटिंग'चा वापर सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आयआयटी चेन्नईसहित देशातील विविध आयआयटी संस्था त्या दृष्टीने काम करत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक- २०२४ पर्यंत देशातील नागरिकांना रिमोट वोटिंगचा लाभ घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

'रिमोट वोटिंग'च्या माध्यमातून देशात निष्पक्ष आणि विश्वासहार्य निवडणूक प्रणाली निर्माण करण्यासाठी काम सुरू आहे. येत्या दोन तीन महिन्यात त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. याच वर्षी चेन्नई आयआयटीसह देशातील प्रमुख आयआयटी संस्थांशी चर्चा करून रिमोट वोटिंगवर चर्चा करण्यात आली होती. त्यांनतर हा रिसर्च प्रकल्प सुरू करण्यात आला होता. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरु 

एक डेडिकेटेड टीम गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पावर काम करत आहे. रिमोट वोटिंगची ही संकल्पना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरु होईल, अशी आम्हाला आशा आहे, असे सांगतानाच या प्रकल्पाचा अर्थ इंटरनेटद्वारे मतदान करणे नाही आणि घरून मतदान करण्याचाही नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

मतदान प्रक्रिया बदलणार

स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वसनीय मतदान प्रक्रिया होण्यासाठी आयोगाने मतदानात पारदर्शिता आणण्यावर आणि गोपनीयतेवर नेहमीच भर दिला आहे. त्यासाठीच आयोग वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा करत असतो. त्याचाच भाग म्हणून मतदानाच्या या नव्या मॉडेलला आकार दिला जाईल. त्यामुळे मतदान प्रक्रियेत काही बदलही होणार आहेत. राजकीय पक्ष आणि अन्य पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितले.

अनिवासी भारतीयांचे वन वे इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान

परदेशातील मतदारांना वन वे इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यावरही अरोरा यांनी भाष्य केले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आयोग याबाबत एक सेमिनार आयोजित करणार आहे. त्यात या सर्व गोष्टींवर चर्चा केली जाईल, असं ते म्हणाले. सध्या अनिवासी भारतीयांना त्यांच्या पासपोर्टवर ज्या मतदारसंघाचे नाव आहे, त्या ठिकाणी मतदान करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे.

घरून नाही, तर बुथवर येऊनच मतदान 

ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबाबत माहिती देताना माजी ज्येष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना यांनी रिमोट वोटिंग म्हणजे घर बसल्या मतदान नसल्याचे सांगितले आहे. ही दुतर्फा इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टिम आहे. म्हणजे बायोमॅट्रीक हजेरी घेणे आणि वेब कॅमेऱ्याचा वापर करून मतदारांचा फोटो घेतल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या वेळेत बुथवर यावे लागणार आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !