मुंबई - राज्याच्या तटरक्षक दलाने अरबी समुद्रात कारवाई करून मोठ्या घातपाताचा डाव उधळला आहे. एका संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ४ हजार ९०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एके ४७ रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही कारवाई पार पडली.
वरळी येथे मुख्यालय असलेल्या तटरक्षक दलाच्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरूवारी ही कारवाई केली. संशयित नौकेला घेरून त्याची तपासणी केली. त्यावेळी नौकेमध्ये तब्बल ४ हजार ९०० कोटी रुपयांचे १६०० किलो अंमली पदार्थ सापडले. तसेच एके ४७ रायफल तसेच १ हजार जिवंत काडतुसेही मिळाली
तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत होती. त्यावेळी तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. यामुळे दलाच्या गस्ती नौकांनी तात्काळ हवाई टेहळणी विभागाला ही माहिती दिली. टेहळणी विमानाने आकाशात घिरट्या घालून या नौकांबद्दल माहिती व नेमके ठिकाण गस्ती नौकेला कळवले.
गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला. मिनी कमांडो मोहिम राबवून नौकेचा ताबा घेतला व तपासणी केली. तीनपैकी ‘रवीहंसी’ ही श्रीलंकन एक मच्छिमार बोट अमली पदार्थ व रायफल घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत होती. अन्य दोन नौका तिला संरक्षण पुरवत होत्या.
या तिन्ही नौकांसह त्यावरील १९ खलाशांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे एका मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे. या मच्छीमारांची अधिक कसून चौकशी केली जात आहे. हा माल कोठून आणला, कशासाठी आणला, याबाबत त्यांची विचारपूस केली जात आहे.