गाव तिथं नाटक । आपल्याला आयुष्यात ‘नाटकच’ करायचंय..

नाटकाचं वेड इतकं लागलं होतं की, सकाळी सुरु केलेली नाटकाची तालीम विना अन्नापाण्याची पहाटपर्यंत येऊन पोहचली कळलच नाही. त्या दिवशीच ठरवलं की आपल्याला आयुष्यात ‘नाटकचं’ करायचंय. कारण जी गोष्ट करताना तुम्हाला इतर कोणतीही गोष्ट अडथळा आणत नाही, त्यावेळी तीच गोष्ट मनापासून करायची. 


माझ्या मनामनात नाटक भिनत चाललं होतं. ते मला जगण्याचं भान देत चाललं होतं. मग जर हेच नाटक कलाकाराला समृद्ध करू शकतं, तर पाहणाऱ्या प्रेक्षकांना ही समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाणारच ना ? मग काय ठरवलं की गावागावात नाटक घेऊन जाण्याचा वसा हाती घ्यायचा. त्याला कारणही तसंच होतं. 


कोरोनामुळे झालेलं लॉकडाऊन. पण हे लॉकडाऊन कलेला नव्हते. विचाराला नव्हते. म्हणून आता नाटक जगायचं. जिथं जागा भेटेल तिथं उभं करायचं. मुंबई, पुण्यात नाटकाचे प्रयोग तर आम्ही केलेच, पण गावा गावात नाटक कसं पोहचणार ? हा प्रश्न पडला होता.

गावाकडील प्रेक्षक शहरातल्या बंदिस्त सभागृहात कसा येणार ? दिवसभर शेतात घाम गाळणारा शेतकरी किंवा कष्टकरी कलेचा आस्वाद कसा घेऊ शकतो ? यावर मात्रा शोधली ती गाव तिथं नाटक या उपक्रमाची. हा उपक्रम नव्हे तर एक चळवळ आहे. गावातली गोष्ट आरसा म्हणून गावातल्या लोकांना दाखवण्याची. 

यातून काही अंशी जरी बदल घडला तरी समाधानाचं जीवन जगता येईल. एक कलाकार म्हणून. या आधी मुंबई पुणे सारख्या अनेक शहरात आमच्या ‘तुमचं आमचं’ या संस्थेचे प्रयोग झाले होते. पुण्यातला नाट्यसृष्टीतला मानाचा पुरुषोत्तम करंडक २०१७ आणि १९ ला मिळवला होता. इतर अनेक पारितोषिके मिळवली.

तसेच कोविड काळात कोलकतामध्ये झालेल्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात देखील सादरीकरणाची संधी मिळाली. पण या सगळ्या काळात विचार मनात आले की, आपण स्पर्धेच्या युगात पारितोषिके, त्यातून मिळणारा पैसा याच्या तर मागे लागलेलो नाही ना ? कारण अनेकांचे सध्या तेच झालेले आहे. 

नाटक हे कला म्हणून जगण्यापेक्षा स्पर्धा जिंकण्यासाठी केलं जातंय असं वाटायला लागलं. त्यातून मिळणाऱ्या मोठमोठ्या रकमेसाठी नाटक करणं ते एका काळापुरतं गरजेचं आहे. पण नाटक समाजाचा आरसा म्हणूनही समोर यायला हवं. म्हणून हा अट्टहास सुरु केला.
 
तुमचं आमचंच्या उपक्रमाचा हा पहिला प्रयोग केला तो नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव या गावात. नंतर तो गुंडेगाव, नगर, भिंगार, लोणी सय्यदमीर, चिचोंडी पाटील, अश्या गावांमधून ८ प्रयोगांपर्यंत आला. सध्या अंत्यकथा, विठाई, आणि लाली ही तीन नाटके या उपक्रमात सादर होत आहेत. 

आमच्या सर्वांची मनापासून इच्छा होती की आम्ही तर आपल्या प्रत्येकाच्या गावात येणार आहोतच, पण आपण ही आम्हाला बोलवलं तरी आम्ही येऊ शकतो. ‘गाव तिथं नाटक’ या उपक्रमाचं नियोजन कसं करायचं, हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर कसं आहे आम्ही आपल्या गावात मिळेल त्या जागेत प्रयोग करतो. 

गावचा चौक, सभामंडप, एखाद्या घराची गच्ची. वाडी वस्ती वरचं मंदिर. अश्या कोणत्याही जागेत आम्ही आपल्याला नाटक दाखवू शकतो. नाटकाचा जन्मच अश्या जागेतून झालेला आहे. अश्मयुगीन काळात माणूस आज दिवस गेला. काय काय घडलं ? असं सांगायचे. असेच नाटक विकसित होत गेलं.

आपण आपल्या गरजेनुसार शहरे, नंतर बंदिस्त सभागृह ही बांधली. पण खरं नाटक मातीतून आलं आहे. त्यामुळे जागेचं कसलंच बंधन नसेल असा हा गाव तिथे नाटकाचा आम्ही मांडलेला प्रपंच आहे. आता सगळ्यात महत्वाचे काय तर हे सगळं शक्य झालं ते आमच्या 'तुमचं आमचं' टीमच्या सगळ्यांच्या एकीने. 

धडपड्या कलाकारी वृत्तीमुळे. जो आपल्या साथीने साऱ्या महाराष्ट्र भर घेऊन जायचा आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपल्याला विनंती करतो की संपर्क साधून आम्हाला आपण ही आपल्या गावात बोलवावे. नाटक घडावे. माणूस घडावा. समाज घडावा. म्हणून कलेतून समृद्ध वाटचालीकडे पाऊल टाकूयात. 

- कृष्ण विलास वाळके (लेखक व दिग्दर्शक)
संस्था - तुमचं आमचं
संपर्क – ८७८८१२१६२४, ९६०४१२६७०५
लोणी सय्यदमीर ता. आष्टी जिल्हा बीड

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !