दुरितांचे तिमीर जावो...

ज्ञानेश्वरी.. 
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीतील अजरामर श्रेष्ठ ग्रंथ..
सातशे वर्षापूर्वी ज्ञानदेव माउलींनी बालवयात आपल्या वाणीने अवघ्या विश्वाला दिशा देणाऱ्या तसेच आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या ग्रंथाची जिथे निर्मिती झाली. ज्या पैस खांबाला टेकून माउलींनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या साकारल्या.
अहमदनगर जिल्हयातील संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे नेवासे... जिथे पसायदान लिहिलं गेेलं, प्रथम म्हटल गेलं.. 

बालवयापासून शाळेत, कार्यक्रमात, रेडीओ, टिव्ही वर, सिनेमा गृहात, पवित्र कार्यात पसायदान ऐकताना, म्हणताना जी मंगल ऊर्जा मिळते. जो संस्कार होतो. ते पसायदान पैस खांब मंदिरातील शांत, पावित्र्य लाभलेल्या सकाळच्या वातावरणात हळुवारपणे ऐकताना जे क्षण अनुभवत होतो. ते शब्दात तरी कसं व्यक्त करावे.

आज हे सारे क्षण अनुभवताना माझ्या भाग्यात हा सुदिन आहे. याचा आनंद वेगळाच होता. माझा मित्र सुदर्शन कुलकर्णी याच्यामुळेच हा सारा योग होता.

खरेच आमच्या अहमदनगर येथे अनेक सिध्दहस्त थोर विभूती होवुन गेल्या आहेत. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आमचे नगर.. खरेच देवत्वाचा स्पर्श लाभलेले अहमदनगर धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक स्थळांचे, पर्यटनाचे प्रमूख केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर यायलाच हवें.

इतकी विविधता असलेली ही नगरी खऱ्या अर्थानं जगासमोर तेवढ्या ताकदीने पुढे आली नाही. याची खंत वाटते.
हिच वैभवशाली स्थळे परदेशात, किंवा इतर राज्यात असती तर त्यांनी यांना किती जपल असतं.त्याच महत्व सर्वदूर नेत त्या शहरांना कितीतरी समृध्द केलं असतं...!

तरीही,
एवढेच म्हणेन की, मी भाग्यवान आहे इथे माझा जन्म झाला.

- जयंत येलुलकर, 
रसिक ग्रुप, अहमदनगर
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !