अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी उपवनसंरक्षक शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी नागपुरातून अटक केली आहे.
शिवकुमार कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु, पोलिसांनी त्यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेत बसत असताना ताब्यात घेतले. त्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. दीपाली यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केली होती.
दीपाली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. दीपाली यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी चौकशी करून आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणाचा कसून तपास करुन दोषींवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.