नाशिक - राज्यभर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अद्यापही कोरोना लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेले संभ्रम मिटायला तयार नाहीत.
वर्षभरापासून देशभरात कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूने देशातील लाखो नागरिकांचे प्राण घेतले आहे. त्यामुळे हे सक्त थोपवण्यासाठी प्रशासनाने लसीकरणास सुरुवात केलेली आहे.
मात्र, लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, याची लेखी हमी द्या, अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत. यामध्ये मुस्लीम समुदायामध्ये लशीबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.
लेखी हमीची मागणी
खरंतर, मालेगावमध्ये गेल्या 17 दिवसांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. दरम्यानच्या काळात शहरातील तब्बल 2 हजार 451 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये लसीकरण करून घेण्याऱ्या मुस्लीम समुदायातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या अत्यल्प आहे.
मालेगावात कोरोना लस घेणाऱ्या मुस्लीम समुदायातील ज्येष्ठ नागरिकांचा आकडा दोन अंकी देखील नाही, अशी धक्कादायक माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे. लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूची लागण होणार नाही याची लेखी लिहून द्या, अशी मागणी नागरिक करत असल्याची माहितीही संबंधित कर्मचारी देत आहेत.
पोलिओ लसीलाही प्रतिसाद नाही
देशातून पोलिओला हद्दपार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकार पोलिओ लसीकरण राबवत आहे, धर्मगुरू आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार प्रबोधन करून देखील मालेगावात पोलिओचे शंभर टक्के लसीकरण कधीच पूर्ण झाले नाही. त्या प्रमाणेच आता कोरोना लसीकरणाची परिस्थिती बनली आहे.