बापरे | कोरोनाबाबत 'टास्क फोर्स'ने व्यक्त केली 'ही' भीती

मुंबई - राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'टास्क फोर्स'ची बैठक घेतली. यावेळी एक भीती व्यक्त करण्यात आली आहे.


या बैठकीत 'लॉकडाऊन'सारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी होते.

निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. टास्क फोर्सने या बैठकीत आगामी काळात कोरोनामुळे मृत्यू वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी, खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

तर मृत्यूंची संख्या वाढू शकते

बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा, १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना  ठेवण्यात आले आहे.

वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम

दि. २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात. 

कोरोनामुळे मृत्यू वाढण्याचे कारण म्हणजे वेळेवर चाचणी न करणे, रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे, तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे, ही कारणे टास्क फोर्सने सांगितली आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !