अहमदनगर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेले १५ दिवसांपासून बाधित रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात ५ हजार १०७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नगर शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने एकूण १० कंटेंमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या भागात जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळतील, तेथे कठोर निर्बंध लागू होत आहेत. परंतु आता लॉकडाऊन जाहीर होणार नाही, हे स्पष्ट आहे. अहमदनगर शहरात दि. २६ मार्चपर्यंत सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तसेच महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी १० ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन जारी केले आहेत. या झोनमधील परिसर सील केला असून नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचीही तत्काळ कोरोना चाचणी केली जात आहे.
दि. १ मार्च रोजी जिल्ह्यात एकूण २१९ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तेव्हापासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दि. ५ मार्चपासून कोरोना बधितांच्या रुग्णांचा आकडयाने दररोज तीनशेचा टप्पा ओलांडलेला आहे.
जिल्ह्यात सोमवारी २३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ हजार २६५ आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९५.४० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ५४६ इतकी आहे.
'या' १० ठिकाणी कंटेंमेंट झोन
अहमदनगर शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव येथे तीन ठिकाणी, तर सोमवारी दुपारी सुडके मळा (बलिकाश्रम रोड), गणेश चौक (सिव्हिल हडको), कोहिनुर मंगल कार्यालय समोर (गुलमोहर रोड) येथे तीन ठिकाणी, तर सायंकाळी सारसनगर, केडगाव, माणिकनगर आणि नगर पुणे रोड परिसरात कटेंन्मेंट झोन जाहीर केले आहेत.