अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी ६ ते ७ दिवस विलंब लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याचा आरोप अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने केला आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने कोरोना चाचणीचे अहवाल एका दिवसात देण्याची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा रुग्णालयातील डॉ. जमदाडे यांना देण्यात आले.
यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे पाटील, छावा जिल्हा सचिव गणेश गायकवाड, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात स्वॅब दिल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर त्याचा अहवाल येतो.
तोपर्यंत स्वब देणारा बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असतो. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. खाजगी प्रयोगशाळेत तातडीने कोरोना चाचणीचा अहवाल दिला जात असताना, जिल्हा रुग्णालयात मात्र मोठा कालावधी लागत आहे.
यापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिल्यानंतर संबंधित व्यक्तीस होम कॉरन्टाईन केले जात होते. त्याचबरोबर पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला हातावर शिक्का मारला जायचा. सध्या अशा प्रकारे कार्यवाही होताना दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा रुग्णालयात सर्व सामान्य नागरिक कोरोना चाचणीसाठी येत असतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल एका दिवसात देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.