'नो-मास्क कंट्रोल'साठी खुद्द कलेक्टर, एसपी एक्शनमोड मध्ये...

विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई

जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि पोलीस अधीक्षक पाटील यांची नगर शहरात अचानक तपासणी

अहमदनगर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त 'नो-मास्क' फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून हाताबाहेर चाललेली परिस्थिती  'कंट्रोल' करण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे थेट रस्त्यावर उतरले.

स्वस्तिक स्टॅन्ड : शिवशाही बस मध्ये विनामास्क प्रवाशांवर कारवाई करताना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येत असून अशा नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात विनामास्क नागरिक आढळून येतील, अशा दुकानांवर महिनाभर बंदी घालण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींची यावेळी उपस्थिती होती. 

त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी थेट भिंगारवाला चौक गाठला. तेथील  दुकानांत तसेच रस्त्याने विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना फटकारले आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या व्यक्ती विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.

स्वस्तिक स्टॅण्डवर प्रवाशाना आवाहन

या नंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आपला मोर्चाचे थेट पुण्याकडे जाणार्‍या बसेस थांबतात, त्या स्वस्तिक स्टॅन्ड कडे वळविला. तेथे आलेल्या शिवशाही बसमध्ये असणार्‍या विनामास्क प्रवाशास इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याबद्दल फटकारले आणि त्यांना दंड भरण्यास सांगितले. 

तेथे आलेल्या इतर बसेसचीही तपासणी करण्यात आली. नागरिकांनाही त्यांनी आवाहन करुन, कोरोना संसर्ग रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ दंड भरला म्हणजे जबाबदारी संपत नाही, तर प्रत्येकाने स्वतः बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय,  झेडपी कर्मचाऱ्यांवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी. शासकीय कार्यालयात 'मास्क नाही-प्रवेश नाही' अशी मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आज अचानक त्यांनी पोलीस अधीक्षकांसह जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी तेथे विनामास्क आढळलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली. तेथून थेट त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि समोर असलेल्या इमारतीतील कार्यालयांना भेट दिली. यावेळी काही कर्मचारी विनामास्क आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला.

अन्यथा कठोर निर्णय घेणार... 

सध्या कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर जिल्हावासियांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. 

तर 'महिनाभर दुकान बंद' कारवाई करणार 

शहरातील काही दुकानांत दुकानमालक तसेच कर्मचारी विनामास्क असल्याचे दिसतात. तर दुकानात जाणारे काही नागरिकही विनामास्क आढळून येत आहेत. यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधित दुकान पुढील महिनाभर बंद ठेवण्याची कारवाई करण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, केवळ दंड वसूल करणे हे उद्दिष्ट नसून वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

मंगलकार्यालयावर दण्डात्मक कारवाई : पोलीस अधीक्षक पाटील - दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख श्री. पाटील म्हणाले, पोलिसांनी ज्या ठिकाणी लग्न समारंभ होत आहेत, अशा मंगल कार्यालयांना भेटी देऊन ज्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे, अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !