आर्थिक गाडी घसरली होती, पण 'यांनी' सांभाळला अर्थचक्राचा डोलारा

मुंबई - शेती शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या 'विकेल ते पिकेल' या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारणमंत्री शंकर गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष समिधा नाईक, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, रोहयो व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

कोरोनाने जगाची आर्थिक गाडी घसरली, पण, या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचे काम शेतकऱ्यांनी केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी, मालाचा दर्जा चांगला राहावा, त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनाने विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. 

संपूर्ण कोकणपट्टा सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. माझे कोकणावरचे प्रेम मी कधीच लपवले नाही. म्हणूनच मी गेल्या वर्षी भराडी देवीच्या दर्शनाला आलो होतो. तेव्हा कोकणातील योजना आणि व्यथांचा विचार केला. त्यातील अनेक गोष्टी मार्गी लावत असताना कोरोना आला आणि सगळं ठप्प झाले. असे असले तरी कोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच. 

माझा कोकण संपन्न झाला पाहिजे, त्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री यांनी केली. 

माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे असा आशीर्वाद मागताना कोकणच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. भराडी मातेची कृपा म्हणून इतके वर्ष मार्गी न लागलेल्या या तीन योजना आज मार्गी लागत आहेत, याचा निश्चित आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकात तीनही पाटबंधारे योजनांची वैशिष्ट्ये, साठवण क्षमता आणि खर्च याची माहिती दिली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !