मुख्यमंत्री संतापले ! म्हणाले, "स्वयंशिस्त पाळा, 'लॉकडाऊन' लावण्यास भाग पडू नका"..

मुंबई - पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. स्वयंशिस्त पाळा, अन्यथा लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे, त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले होते. एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण आहे. सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. 

हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. 

अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले.  

लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !