मुंबई - गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आज त्यांनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी, डॉ तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या ४ महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते.
मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.
जे नियम पाळणार नाहीत, त्यांना कडक कारवाईला तर सामोरे जावेच लागेल, पण त्यांच्या स्वतःच्या आरोग्यालाही गर्दीचा आणि निष्काळजीपनाचा धोका आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.