अहमदनगर : हैदराबादहून फॉर्च्युनर गाडीत व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आरोपी बाळ बोठेला शनिवारी पारनेरला आणणार्या पोलिसांनी रविवारी मात्र 'फॉर्च्युनर, ना पोलिसांचा पिंजरा' पण बोठेला बेड्या घालून पायी चालवत पारनेर न्यायालयात आणले. प्रसार माध्यमांनी टीकेची झोड उठविल्यामुळे पोलिसांनी आज आपली चूक दुरुस्त करत बोठेला पोलीसी खाक्या दाखविला. बोठेच्या आवतीभोवती पोलिसांचा गराडा असल्याने बोठे याच्या कुटूंबियांनाही त्याच्याजवळ जाऊ दिले गेले नाही.
शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बोठे यास हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिरंगा लावलेल्या अलिशान फॉर्म्युनर कारमधून त्याला पारनेर येथे आणण्यात आले. बोठे यास सामान्य आरोपीप्रमाणे वागणूक न देता व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली. त्याच्यासाठी स्वतंत्र बराकही तयार करण्यात आली.
त्याला विशेष जेवण दिल्याचेही सांगण्यात येते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बोठे यास पारनेर येथे आणण्यात आल्यानंतर त्याच्या अटक प्रक्रियेस बराच विलंब लागला. त्यामुळे त्यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले नाही.
रविवारी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास त्यास मोठया पोलिस बंदोबस्तात चालत न्यायालयात नेण्यात आले. उपविभागिय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, विजयकुमार बोत्रे हे न्यायालयात उपस्थित होते.
'बाळ बोठे हा आरोपी आहे, की सरकारचा पाहुणा', असा संताप व्यक्त करत हत्या झालेल्या रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले होते. तसेच आरोपी बोठे ला पोलिसांकडून मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंट विरोधात आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे ते तक्रार करणार होते. या बाबत योग्य ती दखल न घेतल्यास ४८ तासात आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
आज बोठेला न्यायालयात आणले त्यावेळी रूणाल जरे हा न्यायालयात उपस्थित होता. मात्र आज बोठेची ठेप कमी झाली असली तरी यापुढे बोठेस सामान्य आरोपीप्रमाणेच वागणूक मिळावी अशी अपेक्षा रूणाल यांनी व्यक्त केली. यासंदर्भात वकीलांशी चर्चा करून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे जरे यांनी सांगितले.
यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून ३० नॉव्हेवर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुप्या जवळ हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी काही तासांमध्ये पाच आरोपीना अटक केली होती. मात्र, या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार बाळ बोठे हा फरार झाला होता.