हायकोर्टाचाही भाजपला दणका ! जळगाव महापालिकेवर सेनेचे वर्चस्व ?

औरंगाबाद : शिवसेनेच्या जोरदार सर्जिकल स्ट्राईकने घायाळ झालेल्या भाजपला आता उच्च न्यायालयाच्या  औरंगाबाद खंडपीठाने देखील दणका दिला आहे. महापौरपदाची निवडणूक टाळण्यासाठी भाजपने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळली आहे. 

दरम्यान,  शिवसेनेने 30 नगरसेवक आपल्या तंबूत ओढून आणले आहेत. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. 

57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत

महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्शवभूमीवर 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहेत. फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 

महासभा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन घेतली तर व्हीप  बजावता येईल, अशी भूमिका मांडली. परंतु, कोरोना परिस्थिमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्याचे आदेश देत औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका  फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे लक्ष

आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या महापौरपदाचे उमेदवार जयश्रीताई महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते. 

शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या ऑनलाइन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


भाजपचे उमेदवार गुलदस्त्यात

भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजपने देखील सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

पक्षाच्या उमेदवारा व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे. मात्र महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !