अहमदनगर : हैद्राबाद येथील एका हॉटेलमध्ये दाराला कुलूप लावून लपलेला राज्यातील एका आघाडीच्या वृत्तपत्रातील अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक असलेला फरार आरोपी 'बाळ' बोठे याला अहमदनगरच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठेला अहमदनगर येथून फरार होण्यापासून ते तीन महिने लपून राहण्यासाठी कोणी कोणी मदत केली त्यांनाही अटक धरून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता बोठेला मदत करणारांची काही खैर नाही. मदत करणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरील इंटेलिजन्सच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुप्याजवळील घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तासांमध्येच पाच आरोपीना अटक केली होती. मात्र या हत्याकांडाचा मुख्यसूत्रधार आरोपी बाळ बोठे हा फरार झाला होता. तेव्हापासून तब्बल तीन महिने पोलीस बोठेच्या मागावर होते. सातत्याने सुरु असलेल्या तपासात सुमारे शंभर ठिकाणी "सर्चिंग ऑपरेशन' करण्यात आले.
राज्यातील पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कामी मदत केली. अहमदनग आणि राज्याच्या 'आयटी सेल'ची कामगिरी अतिशय महत्वाची ठरली. त्यांच्याकडून दीडमहिन्यांपासून मिळालेल्या लिंकच्या आधारे अखेर बोठे कुठे लपून बसला त्या ठिकाणाची माहिती अहमदनगरच्या टीमला मिळाली.
त्यानुसार संपूर्ण तपासाची दिशा हैद्राबादला वळविण्यात आली. त्यासाठी नुकतेच तेलंगणाचे अतिरिक्त महासंचालक बनलेले अहमदनगर येथील पाथर्डीचे सुपुत्र महेश भागवत यांचे मोलाची मदत झाली. त्यांच्या मदतीने हैद्राबाद येथील बिलालनगर परिसरात तीन पथकांनी पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
दरम्यान तीन वेळा हाती आलेला बोठे निसटून जाण्यात यशस्वी झाला. शेवटी तेथील एका हॉटेल मध्ये बोठे असल्याची माहिती मिळाली. तिन्ही टीमने आज पहाटे साडेसहाच्या सुमारास बळाचा वापर करत हॉटेलमध्ये प्रवेश केला. येथील एका खोलीत बाहेरून कुलूप लावून बोठे आत लपला होता. त्या खोलीतून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी
बाळ उर्फ बाळासाहेब जगगनाथ बोठे (रा. बालिक्सश्रम रोड, अहमदनगर ), जनार्धन अकुला चंद्रप्पा (सामोसा नगर, हैद्राबाद, तेलंगणा), राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईस शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ या सर्वांना हैद्राबाद तेलंगणा येथून ताब्यात घेतले आहे. तसेच महेश वसंतराव तनपुरे (वय ४०,नवलेनगर, गुलमोहोर रोड , सावेडी अहमदनगर ) यास ताब्यात घेतले आहे. तसेच पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हि महिला आरोपी फरार आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
आरोपी बोठेसह ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपीना लवकरच अहमदनगरमध्ये आणून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पुढील तपासासाठी बोठेची पोलीस कोठडी मागण्यात येईल. प्राथमिक चौकशीत, बदनामी होईल याची भीती असल्याने बोठेने रेखा जरे चे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले आहे.
पुढील तपासात कोणत्या कारणामुळे बदनामी होईल, असे बोठेला वाटत होते, आणखी कोणाचा सहभाग होता काय, कोणी कोणी मदत केली, यामागे दुसरे काही कारण होते का अशा अनेक प्र्शाची उत्तरे पोलिसांना बोठेकडून हवी आहेत.
दरम्यान, या प्रकरणात पहिले पाच आरोपी अटक आहेत आणि बोठेसह आणखी पाच आरोपीना ताब्यात घेण्यात आल्याची माहीती पाटील यांनी दिली. यामध्ये बोठे तेथे लपण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन सर्व मदत करणारा हैद्राबाद येथील वकील जनार्धन अकुले याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहमदनगर येथून एकाला काल रात्री ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या रडारवर कोण?पुढील तपासात बोठेला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली. अहमदनगर येथून फरार होण्यापासून ते थेट हैद्राबाद येथे जाण्यापर्यंत बोठे कुठे कुठे राहिला, कोणत्या मार्गाने गेला, त्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा कसून तपास केला जाणार आहे. काही लोकांची नावे निष्पन्न झाली असून अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. यामध्ये बोठेचे जवळचे मित्र, कामातील काही 'निकट'चे सहकारी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे सराईत काही खास मंडळी पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय राजकीय क्षेत्रातील काही लोकांनी बोठेला मदत केली काय? याचाही शोध घेतला जाऊ शकतो. तसेच या काळात आर्थिक मदत केली का, हे देखील पडताळले जाणार आहे. बोठे जो मोबाईल वापरत होता तो पूर्वी एक सराईत गुन्हेगाराचा होता. या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधीकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कटके (स्थानिक गुन्हे शाखा ), पोलीस निरीक्षक यादव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, महिना पोलीस निरीक्षक गडकरी, (आर्थिक गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे, पोलीस उप निरीक्षक समाधान सोळंके, पोहेकों रविंद्र पांडे,
पोना रविकिरण सोनटक्के, पोना दिपक शिंदे, (मोबाईल सेल), पोना राहुल गुंड, पोना अभिजीत अरकल (सायबर पोलीस स्टेशन), जयश्री फुंदे, पोना संतोष लोदे, पोना गणेश धुमाळ, पोना भुजंग बडे, पोकों सचिन वीर, सुपा पोलीस स्टेशन, पोको सत्यम शिंदे, पोकों चौगुले, पोकॉ मिसाळ, पोको सानप, पोकॉ रणजीत जाधव, पोकॉ युगे, पोकॉ जाधव, पोकॉ दातीर, पोकॉ प्रकाश वाघ, पोना राहुल डोळसे व पोकॉ रितेश वेताळ आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.