नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा ! कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये धरपकड... काय आहे प्रकरण ?

अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील एका बोगस कर्जप्रकरणी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात छापे टाकून धरपकड सुरु केली आहे. आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांपैकी दोघांना ताब्यात घेतले असून कारवाईचा सुगावा लागताच अन्य आरोपी फरार झाल्याचे समजते.

नगर अर्बन बँकेचे संचालकमंडळ सध्या बरखास्त करण्यात आलेले असून प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे ( रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या काळात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे संचालक ताब्यात 

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे नगरला आले. त्यांनी काही ठिकाणी शोध मोहीम राबविली. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक ही कारवाई करीत आहे.  तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. अन्य आरोपी मात्र अद्याप हाती लागलेले नाहीत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !