पोलिससोबत चकमकीत पाच नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोलीत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करत पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली. 


मुंबई : गडचिरोलीत पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत आज झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नखलवाद्याना यमसदनी धाडलं. या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.


घातपाताची होती शक्यता
उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत नक्षलवादी मोठया प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली पोलीसांनी विशेष मोहिम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला.


गडचिरोली पोलीस अधिक्षक अंकित गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पुर्णपणे बिमोड करण्यासाठी हे नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

जाबाज पोलीस टीम

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांनी नक्षलविरोधी अभियानाची आखणी केली.

अशी केली कारवाई

अपर पोलीस अधीक्षक कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. 

त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले. 

मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. 

सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलीसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

43 लाख रुपयांचे बक्षीस

या धडाकेबाज कारवाईत पाचही मृतक नक्षलवाद्यांवर जवळपास 43 लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले. 

या अभियानात घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी व 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून सदर मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.

मोठा शस्रसाठा हस्तगत

पोलीसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठया प्रमाणात नक्षलवादयांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले.

मृत नक्षलवादी रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी (वय-46 वर्ष, रा. जवेली (बु.) पोस्टे जारावंडी (डीकेएसझेडसीएम) टिपागड एलओएस पदावर कार्यरत) याच्यावर एकुण- 155 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 41 गुन्हे, चकमकीचे - 78 गुन्हे, दरोडा-1 विविध जाळपोळीचे- 16 गुन्हे, व इतर-19 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकुण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

राजु ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम (वय-32 वर्ष, रा. मरकेगाव, पोमके सावरगाव, टिपागड एलओस, उपकंमाडर या पदावर कार्यरत) याच्यावर एकुण- 14 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 05 गुन्हे, चकमकीचे - 03 गुन्हे, जाळपोळीचे- 03 गुन्हे, दरोडा-01 व इतर -02 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकुण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अमर मुया कुंजाम (वय-30 वर्ष रा. जागरगुडा बस्तर एरीया (छ.ग.) पार्टी मेंबर, कसनसुर एलओएस या पदावर कार्यरत) याच्यावर एकुण- 11 गुन्हे दाखल असुन यात चकमकीचे 08 गुन्हे व इतर -03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकुण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आनाम (वय-38 वर्ष, रा. कापेवंचा, उपपोस्ट राजाराम (खां.), टिपागड एलओएस, प्लाटुन क्र. 15 ची पार्टी मेंबर) हिच्यावर एकुण- 31 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 11 गुन्हे, चकमकीचे – 11 गुन्हे, व इतर -09 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकुण 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


अस्मीता ऊर्फ सुखलु पदा (वय - 28 वर्ष, रा. गुर्रेकसा, पोमके कटेझारी, टिपागड एलओएस पार्टी मेंबर) हिच्यावर एकुण-11 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 01 गुन्हा, चकमकीचे - 05 गुन्हे, जाळपोळीचे- 02 गुन्हे व इतर - 03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिच्यावर एकुण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !