मुंबई - लातूर जिल्ह्यातील उजळंब ते रोहिणा या जिल्हामार्गावरील काम अग्रक्रमाने पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगतानाच याचा पहिला टप्पा ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
विधानसभा सदस्य बाळासाहेब पाटील यांनी उजळंब ते रोहिणा जिल्हामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण म्हणाले, कोरोनामुळे या रस्त्याच्या कामाची गती कमी झाली मात्र आता अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या कामाची गुणवत्ता राखण्यासाठी त्याची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून पाहणी केली जाईल त्याच्यानंतर कामाची देयके दिली जातील, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिमन्यू पवार, प्रशांत बंब यांनी भाग घेतला.