कोल्हापूर : अनेक वेळा तगादा लावूनसुद्धा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे कर जमा होत नाहीत. कर जमा करण्याची हि डोकेदुखी थांबण्यासाठी कोल्हापुरातल्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीने एक आयडियाची कल्पना लढवली आणि कर भरण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः रांगा लावल्या.
कर कसा गोळा करायचा असा प्रश्न इतरांप्रमाणेच सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीलाही पडायचा. 15 हजार लोकसंख्येच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीत तब्बल 58 लाख 12 हजार 729 थकबाकी आहे. म्हणूनच त्यांनी ही शक्कल शोधून काढली आहे. 'कर भरा आणि सोन्याची अंगठी जिंका', अशाप्रकारे थकलेला कर भरणारांवर बक्षिसांची अशी लयलूट केली जाणार आहे. या बक्षिसांचा खर्च सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्यांनी स्वतः उचलला आहे. विशेष म्हणजे विरोधी सदस्यांनीही त्यामध्ये हातभार लावला आहे. सिद्धनेर्लीचे ग्रामस्थही या नव्या ऑफरवर खूष आहे.
कर थकल्यानंतर ग्रामपंचायतीचा खर्च भागवताना संबंधित प्रशासनाच्या नाकीनऊ येते. म्हणूनच हा नवा लकी ड्रॉ कर जमा करण्यास मदतीचा ठरेल. कर वसुलीसाठी सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीने हा एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.