सांगली : प्रथमच पूर्ण बहुमताने आलेली भाजपची सांगली, मिरज आणि कुपवाड नगरपालिकेतील सत्ता राष्ट्रवादीने अवघ्या अडीच वर्षात उलथून टाकली आहे. महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. यामुळे दुसर्याची सत्ता उलथून लावण्यासाठी 'ऑपरेशन लोटस' राबविणाऱ्या भाजपवरच नामुष्कीची वेळ आली आहे.
सकाळी साडेअकरा वाजता जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष ऑनलाईन मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कोल्हापुरातून तर भाजपच्या सदस्यांनी खरे क्लब हौस येथून मतदान केले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर झाला आणि या निवडणुकीत ३९ विरुद्ध ३६ मतांनी दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले.
आज सकाळ पर्यंत या निवडणुकीतील सस्पेन्स कायम होता. महापौर राष्ट्रवादीचा कि काँग्रेसचा हे शेवट्पर्यंत गुलदस्त्यात राहिले. भाजपकडे ४२ जणांचे बहुमत होते. प्रत्यक्षात मात्र ते जुळलेच नाही. भाजपचे सात सदस्य फुटले. तसेच पाच जनआणि राष्ट्रवादीला मतदान केले तर चौघे गैरहजर होते.
पक्षीय बलाबल
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत ७८ जागा आहेत. भाजप - ४१, काँग्रेस- २०, राष्ट्रवादी -१५ आणि अपक्ष- २ अशी पक्षीय बलाबल आहे. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली तर राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी ३९ मते मिळवून विजयी झाले.