मुबई : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचा फॉर्मुला राबवण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. शक्य असेल त्या महापालिका आणि जिल्हा परिषदेत एकत्र येऊन महाविकास आघाडीतील तीन किंवा दोन पक्ष आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने पुढाकार घेत बैठकही बोलवली आहे. येत्या वर्षभरात राज्यात 15 मोठ्या महापालिका आणि 27 जिल्हा परिषदा आणि 100 च्या घरात नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे वेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग झाला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव अजेंडा डोळ्यासमोर ठेवून ही महाविकास आघाडी स्थापन झाली. जर हे तीन पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येऊ शकते याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आली. त्यामुळेच भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत.
महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत सध्या जो पक्ष क्रमांक एकवर असेल त्याच्या नेतृत्वाखाली ती महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवली जाणार आहे. जसे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, त्यामुळे तिथे राष्ट्रवादीला महत्त्व दिले जाणार आहे.
राज्यात 2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे पूर्ण पानीपत झाले होते. येत्या वर्षभरात होणाऱ्या 15 महापालिकांपैकी पाच महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. भाजपचे महापालिका आणि जिल्हा परिषदेतील वर्चस्व मोडण्यासाठीच एकत्र निवडणूक लढवण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
नवी मुंबईत भाजपची सत्ता आहे. कोल्हापूरात महाविकासआघाडीची सत्ता आहे. वसई-विरार बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची, तर औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. उरलेल्या 10 महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार असून 10 पैकी तब्बल 8 महापालिका भाजपकडे आहेत. यात पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, अकोला, अमरावती, सोलापूर, उल्हासनगर यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडे मुंबई आणि ठाणे या दोन महापालिका आहेत
कोल्हापुरात मात्र बिघाडी
भाजपला राज्यातील सत्तेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येणार असले तरी काही ठिकाणी आघाडी होण्याची शक्यता अवघड आहे. जसे कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगळे लढणार असल्याचे स्पष्ट आहे. इतरही काही ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही, मात्र जिथे भाजप वरचढ आहे, तिथे आघाडी करूनच निवडणूक लढवली जाणार आहे.