मुंबई: पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विशेष कर्ज योजनांच्या नावाने बनावट अॅप्लिकेशन तयार करून देशातील शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कामगिरी केली आहे. आपणही असे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल अगर करणयास असाल तर सावधान.
शिवाय आरोपींनी पीएमवायल योजनेचे सर्व फोटो वापरुन एका अॅप्लिकेशनवर संपर्क क्रमांक म्हणून कुर्ल्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मोबाईल नंबरचा वापर केला. हा तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याला या अॅप्लिकेशन संदर्भात अनेक व्यक्तींचे धमकीचे फोन येऊ लागले. यासाठी भरलेली रक्कम परत मागण्यासाठी आलेल्या फोनमुळे त्या तरुणाला काय करावे ते कळत नव्हते. शेवटी त्याने कंटाळून मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी त्या तरुणांच्या तक्रारीवरुन तपास केला असता पोलिसांना ही धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकरणी संजीव कुमार सिंह (वय 36 वर्षे), प्रांजूल राठोड (वय 27 वर्षे), रामनिवास कुमावत, (शिक्षण : बी टेक ( आय टी ) वय २५ वर्षे) आणि विवेक शर्मा (वय 42 वर्ष) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
शासकीय मुद्रा, पंतप्रधानांच्या फोटोचा वापर
प्रधानमंत्री योजना लोन, पीएम लोन योजना,'पीएमवायएल लोन, सर्वोत्तम फायनान्स लोन सर्व्हिस अशा विविध नावाने मोबाईल अॅप तयार केले होते. ज्यात त्यांनी शासकीय मुद्रेचा आणि पंतप्रधानांच्या फोटोचा वापर केला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी नागरिकांना जाळय़ात ओढण्यासाठी पेपरात जाहिराती देखील दिल्या होत्या. एका व्यक्तीकडून किमान 900 ते 3 हजार रुपये घेवून या टोळक्याने 4 हजार जणांची फसवणूक केली.