कोईम्बतूर : एका हत्तीला अतिशय क्रूरपणे मारले जात असल्याचा व्हिडीओ तामिळनाडूमध्ये समोर आला आहे. हा व्हिडिओ एका रिज्युविनेशन कॅम्पमधला असून त्यात दोन लोक झाडाला बांधलेल्या हत्तीला मारत असल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओत हत्तींच्या पायावर दोन लोक क्रूरपणे लाकडाच्या काठीने मारताना दिसत आहेत. हत्ती वेदनेने जोरजोरात विव्हळतो आहे. हा हत्ती श्रीविल्लथुपूर मंदिराचा असल्याचे समजतेय. मारणारे दोन्ही जण माहूत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका व्यक्तीने या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवला. हा कॅम्प कोईम्बतूरपासून जवळपास ५० किलोमीटर दूर ठेक्कमपट्टी इथे सुरू आहे.
या क्रूर घटनेवर आक्षेप घेत वन्य प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मते, हा हत्ती आजारी आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोसमेंट्स या संस्थेकडून ४८ दिवसांचा हा कॅम्प आयोजित केला जातो. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या शिबिरात हत्तीची खास देखभाल केली जाते. ते आजारी असतील तर विशेष उपचार दिले जातात. त्यांना पौष्टिक खाद्यही दिले जाते. यावेळी मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून एका माहुताला निलंबित केले आहे.