बीड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी करून खुद्द कोरोनालाच 'आव्हान' देण्याचा प्रताप करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात आलेले नव्हते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या सामुदायिक विवाह सोहळ्यास परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाह सोहळ्यास गर्दी करणे या प्रकरणी 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
गोरगरिबांच्या मुला-मुलीची लग्ने झाली असली तरीही या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने हजारोंची गर्दी झाल्याने कोरोनाच्या संकट काळात मोठा धोका निर्माण झाला आहे.
माजलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ्यास महिला लहान मुलांचीही उपस्थिती होती. लग्नसोहळ्यात गर्दी झालेली असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सामुदायिक विवाह सोहळा घेताना सर्व नियमांचे पालन केले असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र पहायला मिळाले.
याठिकाणी जमवलेली गर्दी कोरोणाला निमंत्रण देणारी होती. सामाजिक उपक्रम करत असताना कोरोनाच्या संकटाचे भान देखील ठेवायला हवे होते. संयोजकांकडून नियम पाळण्यात आले नाहीत. तसेच परवानगी नसताना रॅली काढणे आणि सामूहिक विवाह सोहळ्यात गर्दी जमवणे यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी दिली आहे.