नाशिक : राज्यात झपाट्याने कोरोना वाढत असतानाच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसेच रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्यांची आढावा बैठक देखील पार पडली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.
भुजबळांनी केले ट्विट
'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.' असं ट्वीट करत भुजबळ यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.