अमृतसर: काँग्रेसच्या अडचणी काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. यामुळे मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे.
मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली हे लष्करातील माजी कमांडर आहे. आम आदमी पार्टीच्या धोरणांवर प्रभावित होऊन त्यांनी आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहली यांच्या सोबत सोबत अमृतसरचे माजी महापौर ओम प्रकाश गब्बर यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. ओम प्रकाश गब्बर पहिल्यांदा अकाली दलाच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. 2017मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकही लढली होती.
आम आदमी पार्टीची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढत आहे. नुकत्याच झालेल्या गुजरातच्या सूरत महापालिका निवडणुकीत आपने 15 जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी आप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पंजाबमध्येही आपची लोकप्रियता वाढत आहे. तर दुसकरीकडे काँग्रेसमधील आपसातील बंडाळी चव्हाट्यावर आल्याने पक्षात दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात आपला मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसचे अनेक नेते आपमध्ये सामील होत आहेत.
या नेत्यांचा 'आप' प्रवेश
दरम्यान, एसएस कोहली यांच्यासह काँग्रेसच्या मजदूर विभागाचे जिल्हा अध्यक्ष साहिब सिंग, माजी बँक पदाधिकारी जे. एस. बिंद्रा यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच तरसेम सिंग रानीके. मंजीत सिंह वडाली. बूटा सिंग संगतपुरा, निशान सिंग ग्रिडिंग, मजार सिंग, मणी ब्लू सिटीचे राजकुमार आणि कन्हैया तसेच धर्मपाल आदी नेत्यांनी आपचे नेते आमदार कुलवंत सिंग पंडोरी, जयकिशन सिंग रोडी आणि मंजीत सिंग बिलासपूर यांच्या उपस्थित आपमध्ये प्रवेश केला.