पॉंडिचेरी : काँग्रेसप्रणित आघाडीतील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अडचणीत आलेल्या पॉंडिचेरीतील व्ही नारायणसामी यांच्या सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागले. मात्र बहुमत सिद्ध करण्यात सरकारला अपयश आल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात येऊन कोसळले. याचा मोठा धक्का काँग्रेस पक्षाला बसला आहे.
काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्यामुळे ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. १४ सदस्य विरोधी आघाडीकडे, तर सात जागा रिक्त असल्यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण काँग्रेसचे सरकार विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने कोसळले आहे.
नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. एका दिवसाचे विशेष अधिवेशन बहुमत ठराव सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. नारायणसामी यांनी अधिवेशन सुरु होताच बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केल्यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. दरम्यान यासंदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा सोपवला आहे.
राजीनामा देणाऱ्या आमदारांवर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल, असे म्हटले आहे. पक्षासोबत आमदारांनी निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत. जे काही पॉंडिचेरीत सुरु आहे, तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण विजय सत्याचाच होईल, असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकताच पॉंडिचेरीचा दौरा केला होता, हे विशेष. त्यांनी यावेळी एका कार्यक्रमाला उपस्थिती देखील लावली होती.
भाजप हिंदी भाषा लादतेय
भाजप जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायणसामी यांनी यावेळी केला आहे. आम्ही तामिळनाडू आणि पॉंडिचेरीत दोन भाषांचा वापर करतो, पण भाजप जबरदस्ती हिंदी लादत असल्याचे ते म्हणाले आहेत.