मराठी भाषा गौरव दिनाच्या मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना केले अभिवादन
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या! असे आवाहन केले आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच," या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, मराठीला माय मराठी म्हणण्याचा, अमृताते ही पैजा जिंकणारी भाषा म्हणून तिचा अभिमान मिरविण्यासाठी "मी मराठी, माझी मराठी!' असा बाणा जपू या! त्यासाठी मराठीत विचार करु या, मराठीत बोलू या, व्यक्त होऊ या. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचे स्वीकार करू या. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी,तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करू या. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू या!
मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या. मग पाहू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ? या आपल्या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला आहे.