जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली पहाणी
जालना : कोरोना लसीकरणाचा ड्रायरन आज संपूर्ण देशात घेण्यात आला. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा त्यासाठी समावेश करण्यात आला. त्यापैकी एक असलेल्या जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या ड्रायरनची पाहणी राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली. लस तयार करणाऱ्या एकूण आठ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी तिसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून लसीकरणाला केंद्र शासनाने परवानगी दिल्यास प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. लसीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सज्ज असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, लसीकरणाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होते का, तसेच लसीकरणामध्ये येणाऱ्या अडचणी, संभाव्य चुकांची प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा ड्रायरन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, कोरोनाच्या लसीकरणासाठी मतदान केंद्राप्रमाणे बुथची स्थापना करण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर तीन कक्ष असतील. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल तर दुसऱ्या कक्षात त्या व्यक्तीला लस टोचण्यात येईल. तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही ड्रायरन घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जागतिक आरोग्य संघटनेचे सय्यद मुजिब, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. प्रताप घोडके,डॉ. संजय जगताप, डॉक्टर्स, परिचारीका आदींची उपस्थिती होती. ड्रायरनसाठी 25 आरोग्य कर्मचा-यांना सहभागी करण्यात आले.