एक बिनविरोध आणि थेट निवडणीकीतून एक विजयी
आघाडी केलेल्या 10 जागांवर विजयी पताका
शेवगाव : आज जाहीर झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात आपले खाते खोलले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात 'स्वाभिमानी' वाटचालीस प्रारंभ झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या काही वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांना विविध आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडली होती. यानंतर परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात थेट उतरण्याचा निर्णय घेऊन काही ठिकाणी पक्षाचे उमेदवार तर काही ठिकाणी इतर पक्षाशी आघाडी करून त्यांच्या पॅनल मध्ये सहभागी झाले होते. स्वाभिमानी च्या या राजकीय वाटचालीस शेतकरी जनतेने कौल दिला असून स्वाभिमानीच्या पदरात विजयाचे वाण टाकले आहे.
या निवडणुकीत 'स्वाभिमानी'ने चापडगाव, घोटन, मजलेशहर, ठाकूर निमगाव आदी ठिकाणी विविध राजकीय पक्षांशी आघाडी करून पॅनल उभे केले होते. यांपैकी तब्बल १० उमेदवारांचा विजय झाला आहे.
स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या कष्टाला फळ आलं असून त्यांचे बंधू निलेश गायकवाड यांचा चापडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल बरोबर आघाडी केली होती. तसेच दादेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानी चे अमोल देवढे यांची बिनविरोध निवड झाली आहे.