राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करत स्वराज्याचा विस्तार केला.
युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्यातील रयतेला स्थैर्य प्राप्त झाले, स्वराज्याला सक्षम छत्रपती मिळाले, स्वराज्याच्या शत्रूंवर वचक बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या शिकवणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार केला.