लेखानगरचा अंडरपास बनला अपघातांना निमंत्रक
पाथर्डी फाटा : लेखानगर येथे तयार करण्यात आलेला नवीन अंडरपास हा वाहतुकीस त्रासदायक आणि अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. असून अडचण नसून खोळंबा अशा पतिक्रिया त्रासलेल्या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
मुंबई महामार्गावर उड्डाणपुल उभारल्यानंतर यात अनेक त्रुटी राहिल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे लक्षात आले होते. या पुलाच्या उभारणीच्या वेळी राहिलेल्या त्रुटी सुधारित करण्यासाठी आता पुन्हा बऱ्याच ठिकाणी नव्याने काम करण्यात येत असले तरी लेखानगर येथे तयार करण्यात आलेला नवीन अंडरपास हा वाहतुकीस त्रासदायक ठरत आहे. हा रस्ता केला नसता तरच बरे झाले असते असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. या नव्या रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढणारच असल्याचे दिसत आहे.
मुंबई महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे मुंबई नाका ते पाथर्डी पर्यंतच्या वाहतुकीचा खुप खोळंबा झाला असून अनेकदा यामुळे अपघात होवूनही काही जणांनी आपले प्राणसुद्धा गमविले आहे. या पुलामुळे कमोदनगर येथून सिडकोत येण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अनेकदा कमोद नगर येथील नागरिकांनी आंदोलने केली हेाती. कमोदनगरहून सिडकोकडे येणार्या एका आई मुलांचा अपघात होवून ते दोघेही याठिकाणी ठार झाले होते. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनानंतर याठिकाणी तातडीने भुयारी पादचारी मार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याचवेळी लेखानगर येथेही अंडरपास रस्ता करण्याची घोषणा करण्यात आली होती.
पेठेनगर समोरून थेट सिडकोकडे येण्यासाठीचा रस्ता याठिकाणी करण्यात येणार होता. या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र बर्याच दिवसानंतर या कामाला सुरूवात करण्यात आली असली तरी सध्या बनविलेला हा रस्ता म्हणजे वाहतुकीस अडथळा ठरणार असल्याचे दिसून येत आहे. पेठेनगर समोरून तयार करण्यात येणार रस्ता काही अंतर पुढून करण्यात आल्याने पूर्वी असलेला लेखानगरचा अंडरपास आणि या नवीन रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवू लागला आहे.
पूर्वी लेखानगर येथील रस्त्यामुळेच अनेक अपघात झाल्याचे दिसून आले असून आता या रस्त्यापासूनच अवघ्या शंभरच मीटर हा रस्ता करण्यात आल्याने नक्की नवीन रस्त्याचा वापर कोणी करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या जुन्या आणि नवीन या दोन्ही रस्त्यावरून दुतर्फा वाहतुक होत असल्याने नक्की कोणता रस्ता वापरवा याची जनजागृती होणे अपेक्षीत आहे. तसेच हा नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता हा पेठेनगरच्या समोरून का करण्यात आला नाही याचाही प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.