महाराष्ट्र पोलिस दलाची मान जागतिक स्तरावर उंचावली
नाशिक : जागतिक स्तरावरील गौरवास्पद असा "आयर्न मॅन किताब" पटकविणारे राज्याच्या पोलिस दलातील धडाडीचे, जिगरबाज आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या उतुंग कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या नावाचा समावेश आता "वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन" मध्ये करण्यात आला आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जागतिक स्तरावरील खडतर आणि अवघड आयर्न मॅन किताबावर यापूर्वीच आपली छाप पाडलेली आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या स्पर्धेत ते सहभागी झाले होते. एकाच वेळी धावणे, पोहणे आणि सायकलिंग करणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. त्यात त्यांनी बाजी मारली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली आहे. महाराष्ट्र पोलीस दल आणि राज्यातील जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे.
कृष्ण प्रकाश हे १९९७ बॅच चे महाराष्ट्र पोलीस दलातील एक डॅशिंग, कणखर पण तितकेच संवेदनशील, कायद्यासोबत अध्यात्मिक व संत साहित्यावर प्रचंड पगडा असणारे, सर्व सामान्य लोकांना "माझा अधिकारी" वाटावा असे जनताभिमुख पोलीस प्रशासन निर्माण करणारे अधिकारी आहेत. मालेगाव , बुलढाणा, सांगली , अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक, राज्याच्या सीआयडी व व्हीआयपी सेक्युरिटीचे प्रमुख म्हणून मुंबई अशा प्रतेक ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या कामगिरीचा आलेख नेहमीच उंचावत नेला आणि त्या त्या पोस्टिंग ला पुरेपुर न्याय दिलेला आहे. म्हणूनच "कृष्णप्रकाश" हे नाव सबंध राज्यात अत्यंत आदराने घेतले जाते. वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये "कृष्णप्रकाश" हे नाव आज नोंदवल्या गेल्याने महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आणखी उजळून निघाले आहे.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ...
गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्यांची वेगळीच ख्याती आहे. सध्या पिंपरी-चिंचवड मधील जनता त्यांच्या या कामाची अनुभूती घेत आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा धाक बसविण्याचे काम त्यांनी केले आहे. मी (ऍड. उमेश अनपट) अहमदनगर येथे 'दिव्य मराठी'चा क्राईम रिपोर्टर असताना त्यांची धडाकेबाज कामगिरी स्वतः अनुभवली आहे. गुन्हेगारांना अगदी 'सळी की पळो' करून सोडले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईच्या बातम्या करताना अभिमान वाटे. खासगित बोलताना पोलिस अधिकारी व कर्मचारी म्हणायचे, की नगर जिल्ह्यात आम्हाला आता खऱ्या अर्थाने आमच्या खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांच्या डोळ्यात दिसतो. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील त्यांचा दरारा होता. मी अनूभवलेल्या थोड्या डॅशिंग अधिकाऱ्यापैकी ते एक आहेत.
फळाची चिंता न करता काम करत रहावे : कृष्ण प्रकाश
मी फक्त माझे काम प्रामाणिक पणे करत राहतो. मला मिळालेली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडतो. फळाची चिंता न करता काम केल्यास यश नक्की मिळते, अशी भावना पिंपरी-चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 'एमबीपी लाईव्ह 24' शी बोलताना व्यक्त केली.