मुंबई - यवतमाळ जिल्ह्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ऑटोमेटिक अगरबत्ती तयार करणाऱ्या मशीन्स देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अगरबत्तीला हक्काची बाजारपेठ मिळावी याबाबतचा सामंजस्य करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपस्थितीत सायकल अगरबत्ती ब्रंड सोबत करण्यात आला आहे.
वनात व वनालागत राहणारे आदिवासी व पारंपरिक निवासी यांची उपजीविका व रोजगार निर्मिती याला वन विभागाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात बांबू विकास मंडळ मार्फत अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमा अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ऑटोमेटिक अगरबत्ती तयार करणाऱ्या मशीन्स व १२ ब्लेंडर मशीन लावण्यात येणार आहेत. या उपक्रमा मुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे ई –प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करण्यात वन विभाग नेहमी अग्रेसर राहिला आहे. लोकसेवा अधिनियम अंमलात आल्यापासून सुलभ व पारदर्शक सेवा जनतेला देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ई–टीपी म्हणजे इलेक्ट्रोनिक ट्रान्सपोर्ट पास प्रणाली वन उपज वाहतुकीसाठी राज्यात सुरु करण्यात येत आहे.
या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर नागपूर वन वृतात ही प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीमुळे वाहतूक परवाना संबधितांना तत्परतेने व पारदर्शकतेने व लवकर मिळणार आहे.
यावेळी वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम) सुनील लिमये, वन संरक्षक तथा संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मल्लिकार्जुन रेड्डी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदि उपस्थित होते.