सन 2020 हे वर्ष म्हणजे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवणारे वर्ष ठरले.. कोरोनाचा कहर.. कितीतरी जवळची माणसं काळाच्या पडद्याआड झाली... ही दुखरी नस आयुष्यभर ठसठसत रहाणार हे निश्चित...!
एक चांगल झालं. माणसामाणसातील आपली माणसं ओळखता आली. कोण मनाने आपलं आहे, हे या वर्षांने खरच सर्वांनाच दाखवून दिले. अजूनही कोरोना गेलेला नाही. त्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच. त्यामुळं आपण सर्वजण योग्य ती काळजी घेणारच आहोत. आता तर ती कायमसाठी घ्यावी असं मी म्हणेन...!
चिमुकली घरात बसून कंटाळून त्यांनीही ती परिस्थिती स्विकारली आहे. तडजोड करण्यापेक्षा स्विकारणं महत्त्वाचे नाही का ? काही माणसं जिवाभावाची झाली. या आभासी जगात न भेटताही मैत्र जपून हृदयात विराजमान झाली.. म्हणून या सरत्या वर्षाचे आभार...!
आता नववर्ष नेहमीप्रमाणेच वेगवेगळे संकल्प होतील (कधी न पूर्ण केलेले). पण व्हॉट्स अपच्या माध्यमातून सकारात्मकतेचे दिवे लावणारी माणसं आहेत. त्यांचेही आभार.. अशीच मनामनाची सोबत करत करत पुढे जाऊ... हा आपला प्रवास सर्वांच्याच साथीने करत राहू...!
विचारांचे दिवे आता विझू द्यायचे नाहीत, असं स्वतःच्या मनाला बजावत दुसऱ्यांच्या मनात हे दिवे तेवत ठेवू. कारण ही जगण्याची आस सा-यांच्या मनात सतत जागती राहू दे. मी, माझं, यापेक्षा आपण, आपलं.. हे जपत राहूया..
मोकळ्या मनानं इतरांच्या पाठीवर कौतुकाचे दोन शब्द लिहू. हे दोन शब्द लिहल्याने तुमचा शब्दकोश नक्कीच रिता होणार नाही. शब्द असे दुसऱ्यांसाठी सांडल्यावर अपूर्व समाधान मिळतं ते नक्कीच अनुभवा.
सन 2021 च्या अंतरंगात पाऊल ठेवताना
जात, धर्म, पक्ष, पैशाचा माज, दुसऱ्यांच्या व्यंगावर, बायकांवर फालतु जोक्स करणे, असुया, इर्षा, द्वेष, कुशंका, मत्सर, या सा-या हीन चपला बाहेरच काढून ठेवा. अन मगच प्रवेश करुया 2021 च्या प्रासादात. तुमचं नक्कीच स्वागत होईल.. चला एकमेकींच्या साथीने जाऊ 2021 च्या सुर्य किरणांनी सजलेल्या आशादायी प्रासादात..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)