राज्यभरात महिनाभर ‘क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान’

 मुंबई - कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात ‘संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान’ दि. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. 

याअंतर्गत राज्यातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागातील संख्या ६ कोटी ८२ लाख २३ हजार ३९८ एवढी असून जोखीमग्रस्त शहरी लोकसंख्या १ कोटी ८४ लाख एवढी आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार या दोन्ही आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीचा सामना तर करावा लागतोच त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना संसर्गाचा धोका वाढून त्याची साखळी अखंड राहते. 

त्यामुळे अशा रुग्णांचा शोध, निदान आणि उपचार करण्याकरिता उद्यापासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील. त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

रोगनिदान झाल्यास आरोग्यसंस्थेकडून संपूर्ण मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरीकांनी मोहीम यशस्वितेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !