रेखा जरे यांच्या मुलाचा आरोप
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे याने पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले असून, पत्रकार बाळ बोठे हाच आपल्या आईच्या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.
बाळ बोठे याच्यापासून आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही रुणाल जरे यांनी केली आहे. हे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आलेले आहे.
‘पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे याचे आमच्या घरी येणे-जाणे होते. माझ्या आईचा त्याने अनेकदा मानसिक व शारीरिक छळ केला आहे. तुला किंवा तुझ्या मुलांना ठार करीन, अशी धमकी तो द्यायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कोणी त्याच्या विरोधात बोलत नव्हतो.
पण यापूर्वी माझ्या आईने त्याच्याविरोधात पोलिसांत अर्ज दिले होते. आपल्या आईच्या खून प्रकरणातील आरोपींनी खुनाची कबुली दिली असून त्यांचा सूत्रधार बोठे असल्याचे म्हटले आहे, असेही निवेदनात म्हटलेले आहे.
रुणाल जरे म्हणाले, माझी आजी सिंधुताई आणि धाकटा भाऊ कुणाल हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. बोठे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने आधीच आमचे कुटुंब संपवून टाकण्याची भाषा केलेली आहे. त्यामुळे त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे.
आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला बोठे हाच जबाबदार राहील. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, असेही रुणाल जरे म्हणाले आहेत.