चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा होणार?
अहमदनगर - घोडेगाव (ता. नेवासे) येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणात एक ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, चोरी होऊन दहा दिवस झाले तरी आरोपी सापडत नसल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी दि. १ डिसेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.
दि. १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेला दहा दिवस होत आले असले तरी अद्याप पोलिसांना चोरट्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आज रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार केला. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे आणि पोलिसांना तपासाकरिता आणखी वेळ द्यावा, अशी विनंती पोलिसांनी केली होती.
शेवगाव उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक मुंडे हे सोमवारी सायंकाळपासून घोडेगावमध्ये येऊन ग्रामस्थांची मनधरणी करत होते. पण ग्रामस्थ आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी गावात येत नाहीत, तोपर्यंत नगर औरंगाबाद महामार्ग शांततापूर्व मार्गाने घडवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसे लेखी निवेदन सोनई पोलिसांना ग्रामस्थांनी दिले.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनमंगळवारी सकाळी ९:३० वाजता शनिशिंगणापूर चौफुला येथे रास्ता रोको आंदोलन होणार सांगितले आहे. आंदोलनात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाची कोणतीही गैरसोय होणार नाही, तसेच आपत्कालीन व्यवस्थेमध्ये कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाही देखील ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेली आहे.
तपासाला अचानक कलाटणी
या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांची चौकशी केली. गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी पाहून त्यासारखे गुन्हे केलेले गुन्हेगारही तपासले. पण पोलिसांना कोणताच धागादोरा गवसत नव्हता. आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी गावातील एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
एका संशयित आरोपीला अटक
सोमवारी रात्री सोनई पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली जाईल, अशी विश्वसनीय माहिती MBP Live24 च्या हाती आली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.