अहमदनगर - इंग्लंड देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण द्वारे आलेली यादी राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविली आहे. त्यानुसार, नगर महापालिका क्षेत्रात एकूण १९ तर ग्रामीण भागातील ६ प्रवाशी असे २५ प्रवाशी इंग्लंडहून आले आहेत.
या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, दि. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. दि. २४ रोजी जिल्ह्यातील १२ नागरिक तर आज आणखी १३ जणांची यादी प्राप्त झाली. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने या प्रवाशांची माहिती घेतली.
त्यानुसार, काल (दिनांक २४) महानगरपालिका क्षेत्रातील १० प्रवाशांपैकी २ जण मुंबई येथे क्वारनटाईन आहेत तर ७ जणांचे स्वाब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. दिनांक २५ रोजी ९ पैकी ८ जणांचे स्वाब घेण्यात आले असून त्यापैकी एक अहवाल निगेटिव्ह आला आहे.
उर्वरित अहवालाची प्रतीक्षा असल्याचे महानगर पालिका आरोग्य यंत्रणेने सांगितले. ग्रामीण भागातील कालच्या श्रीगोंदा आणि संगमनेर येथील प्रवासी अनुक्रमे मुंबई तर दुसरा पुणे येथे आहे. आज आणखी ०४ प्रवाशांची माहिती मिळाल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.