कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यादरम्यान इतर अनेक विरोधी नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी कोलाकत्यामध्ये सभा घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे की, भाजपविरोधी एक आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नांतर्गत कोलकात्यात विरोधी नेत्यांची एक मोठी सभा आयोजित करण्याचा आमच्या पक्षाचा विचार आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘दूरध्वनीवरील चर्चेत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
पवार यांनी बंगालमध्ये येण्याची आणि तृणमूलच्या समर्थनार्थ प्रचार करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. अर्थात अद्याप यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काहीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच स्वत: शरद पवार देखील अजून कुणाशी जाहीरपणे बोललेले नाही.