नाशिक - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला, मात्र, तोपर्यंत तो तेथून निघून गेला होता. तपास पथकातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पत्रकार बोठे हा सूत्रधार असल्याचे व त्यानेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तेव्हापासून बोठे फरारी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचे मोबाइल फोन, पासपोर्ट, वाहने घरीच आढळून आली आहेत. त्याच्याकडील परवानाधारक शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.
नाशिकमध्ये हॉटेलमध्ये अधिक चौकशी सुरू असून, त्या आधारे शोध सुरू आहे. यापूर्वी काही ठिकाणांहून अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, नाशिकमधील माहिती खात्रीशीर होती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. तरीही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे.
माने यांनी आणखी माहिती दिली?
जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिल बालकल्याण अधिकारी विजयमाला माने यांची सोमवारी पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी त्यांची भेट घडवून देण्यात आली. काल त्यांचा जबाब नोंदवला होता.