अहमदनगर - पंधरा दिवसापुर्वी नगर तालुक्यात ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील कुख्यात आरोपी विश्वजीत रमेश कासार याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंगने सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले.
यावेळी आशाबाई कासार, विष्णू कासार, अंजली कासार आदि उपस्थित होते. नगर तालुका येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय 21) याला पंधरा दिवसांपूर्वी विश्वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आरोपी असलेला विश्वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये नुकताच खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापि आरोपी फरार असून, पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. आरोपी कासार याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याला तातडीने अटक करण्याची मागणी मयत युवकाच्या आईसह त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
कुटुंबीयांच्या जिवीतास काही झाल्यास याची जबाबदारी आरोपी विश्वजीत कासार यांची राहणार आहे. आरोपीला अटक न करणार्या नगर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकार्याकडून या प्रकरणाचा तपास काढून इतर कोणत्याही पोलीस स्टेशनच्या अधिकार्याकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा भालसिंग परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे.